Home Breaking News चतुःशृंगी पोलिसांची कारवाई: दोन चेन स्नॅचर्सना अटक, चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दुचाकी...

चतुःशृंगी पोलिसांची कारवाई: दोन चेन स्नॅचर्सना अटक, चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त.

55
0

पुण्यातील चतुःशृंगी पोलिसांनी बालेवाडी परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संजय बबरे (वय २९) आणि राहुल मवास (वय २४) अशी असून, दोघांनी ११ तारखेला एका महिलेसह चोरी केलेल्या सोन्याचे मंगळसूत्र ताब्यात घेतले आहे. या सोन्याचे वजन सुमारे १.५ तोळे असून, त्याची किंमत १ लाख रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकीही जप्त करण्यात आली आहे, ज्याची किंमत १ लाख रुपये आहे.

गुन्हा घडल्यानंतर लगेचच चतुःशृंगी पोलिस ठाण्यात कलम ३०९(४) आणि ३(५) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत गुन्हेगारांचा माग काढला. गुप्त माहितीच्या आधारे बालेवाडीत एका नातेवाईकाच्या घरी आरोपी लपून बसल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक योजना आखत दोघांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी दुचाकी देखील चोरीची असल्याचे उघड केले. यामुळे नाशिक ग्रामीण येवला तालुका पोलिस ठाण्यातील वाहन चोरीचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. या प्रकरणात कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईचे नेतृत्व पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त हिममत जाधव आणि सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांनी केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकोटगी, गुन्हे निरीक्षक युवराज नांद्रे आणि त्यांच्या समर्पित टीमने तपास व अटक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.