लोझान: भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने लोझान डायमंड लीगमध्ये गुरुवारी ८९.४९ मीटर फेकून दुसरे स्थान पटकावले. २६ वर्षीय नीरज चोप्रा चौथ्या फेरीपर्यंत चौथ्या स्थानावर होता, परंतु पाचव्या फेरीत त्याने ८५.५८ मीटरपर्यंत फेक केली. मात्र, त्याने शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात सर्वोत्कृष्ट फेक करत ८९.४९ मीटर अंतरावर भाला फेकला, जे त्याच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षा अधिक होते. नीरज चोप्रा सहाव्या फेरीतून बाहेर जाण्याच्या धोक्यात होता, परंतु पाचव्या फेरीत ८५.५८ मीटरची फेक करून त्याने स्वतःला स्पर्धेत टिकवून ठेवले.
ग्रेनेडाच्या दोन वेळा विश्वविजेते आणि पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते अँडरसन पीटर्स यांनी दुसऱ्या फेरीत ९०.६१ मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले, तर जर्मनीच्या जुलियन वेबर यांनी ८७.०८ मीटर फेकून तिसरे स्थान पटकावले.
“शुरुवात चांगली नव्हती, परंतु माझ्या शेवटच्या फेरीतील दुसऱ्या सर्वोत्तम फेकीवर मी आनंदी आहे. सुरुवात कठीण होती, पण माझ्या जिद्दीने खेळून जो कमबॅक केला त्याचा मला खूप आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने स्पर्धेनंतर व्यक्त केली.